Description
संतूच्या स्वभावाचे एक एक पैलू उलगडताना दिघे लिहून जातात- ‘काय दर्जाचा आहे आमचा शेतकरी? हा मूळचाच असा आहे की, भागवत धर्माने याला असे बनवले आहे किंवा तुकारामाच्या शिकवणीने हा असा बोलता झाला आले किंवा अचाट अनुभवाने किंवा आमच्या देशाच्या हवामान, राहणीमुळे हा असा तत्त्वज्ञ बनला?’
देशाच्या हवामान-राहणीच्या म्हणजेच निसर्गाचा व माणूस आणि निसर्ग यांच्यामधील नात्याचा विचार दिघ्यांनी अत्यंत गंभीरपणे केला आहे. संतूच्याच संदर्भात ते लिहितात, ‘निळ्या आकाशाखाली, माळावरच्या बिंगणार्या वार्यात, सूर्याचे ऊन खात, पृथ्वीच्या पोटात नांगर घालीत किंवा मोटेने विहिरीचे पाणी मळ्याला देत तो पंचमहाभूतांशी एकरूप झाला होता. तो खर्या जीवनाशी कृष्णलीला खेळत होता. आनंदाच्या ललकारीत कृषिजीवन जगताना तो नगराकार, विश्वाकार झालेला मला दिसत होता. ‘संतू गात असलेला-’ जिकडे पाहावे तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा’ हा अभंग उद्घृत करून निवेदक पात्राच्या माध्यमातून दिघे लिहितात-, संतू भक्तिरसात गुंग होऊन तो अभंग आळवू लागला. त्या वेळी मला तो दणकट व गाठाळलेला शेतकरी आकाशाच्यापेक्षाही मोठा वाटला. मीदेखील संतूच्या त्या गगनाच्या निळ्या गाभ्याला हात जोडले. त्यावेळी माझी खात्री झाली की, तुकारामबुवाही अभंग लिहिण्याच्या आधी कित्येक दिवस देहूच्या माळावर बसून, आमच्यासारखे त्या रसरसणार्या निळ्या गाभ्याकडे पाहात असले पाहिजेत.’