Description
आधुनिक साहित्य आणि नवसाहित्य या दोन संज्ञा जशा कालवैशिष्ट्ये निर्देशित करणार्या आहेत तशाच त्या प्रकृतीवैशिष्ट्येही निर्देशित करणार्या आहेत. खरे तर या दोन संज्ञा कालवैशिष्ट्य निर्देशित करणार्या आहेत हे म्हणणे तितकेसे खरे नाही. कारण एका विशिष्ट काळात निर्माण होणारे सर्व साहित्य आधुनिक व नव असणार नाही. मर्ढेकरांच्या कालखंडात जे जे लेखन झाले ते ते सारे नवसाहित्यात मोडत नाही. याच कालखंडात वि. वा. शिरवाडकर, बाळ कोल्हटकर, दत्त रघुनाथ कवठेकर, गो. नि. दांडेकर यांसारखे साहित्यिक लेखन करीत होते. पण हे साहित्य काही नवसाहित्यात मोडत नाही. हे साहित्य आधुनिक साहित्यातील काही वृत्ती-प्रवृत्तींचा मागोवा घेणारे साहित्य आहे. तेव्हा मराठीत जे नवसाहित्य म्हणून ओळखले जाते, ते आपल्या काही वैशिष्ट्यांनी सिद्ध झालेले आहे. या नवसाहित्याचा कालखंड स्थूलमानाने 1940 ते 1970 असा धरता येईल.