Description
सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. 'सत्यमेव जयते' यातले सत्यच संभ्रमित झाले आहे. सत्याच्या विजयापेक्षा, विजयी होईल त्यालाच सत्य मानावे लागते आहे. नीतितत्त्वांचा आणि मानवधर्माचा ऱ्हास सुरू आहे. सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. त्याच्या सद्सदविवेकबुद्धीला ग्लानी आली आहे. एका गुंगीत सारा देश जगतो आहे.
तरी मन सांगते... अंधाराचे जाळे फिटेल. पहाट फडफडेल. आकाश प्रकाशाने उजळेल. धीर सोडू नको. परिवर्तन अटळ आहे. आपले आयुष्यही परिवर्तनातून आकार घेत असते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. कळीचे फूल होते. सुरवंटाचे फुलपाखरू होते. वाल्याचा वाल्मीकी होतो. नराचा नारायण होतो.
दुधाचे दही होते, कापसाचे सूत होते, दगडाची मूर्ती होते, मातीची भांडी होतात, सोन्याचे अलंकार होतात आणि शब्दांचे ग्रंथ होतात.
एका वस्तूपासून दुसरी वस्तू आकाराला येताना मूळ वस्तूचे रूप नाहीसे होते, हा निसर्गनियम आहे. या परिवर्तन प्रक्रियेत पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये रूपांतरीत होताना आपले मूळ अस्तित्व टिकवून ठेवते. त्या वस्तूचे नव्याने आकाराला येणारे सुंदर रूप म्हणजे चैतन्य असते.