Description
खेड्यापाड्यातल्या मुलींना लग्नासाठी आता, त्यांच्यासगट त्यांच्या आईबापांनाही नोकरीवालेच मुलं लागत होते. मग ती नोकरी शहरातल्या एखाद्या कारखाना-कामगाराची, एखाद्या दुकानावर काम करणाऱ्याची किंवा एखाद्या बिगाऱ्याची असली तरी चालेल, पण नोकरीच पाहिजे होती; कारण शेवटी ती नोकरी होती. महिना भरल्यावरच्या पगाराच्या खात्रीची होती, शिवाय, त्याच्यानं मुलीला, 'हाताला मळ ना पायाला माती' असल्या सुखात राहता येणार होतं. करता येईल तितकी हौस-मौज करता येणार होती.
पण इथल्या शेतीतल्या मातीत मात्र, तसलं काहीच नव्हतं. इथं दिवस- रात्र, उन्हा-वाऱ्यात, थंडी-गारठ्यात अन् पाण्या-पावसात राब राब राबूनही, कोणत्याच गोष्टीची, कसलीच खात्री देता येत नव्हती. इथल्या निसर्गाच्या दग्या-फटक्याचा, तिन्ही त्रिकाळातल्या कोणत्याच घात - आघाताचा, भरवसा देता येत नव्हता. इथलं जगणंच सगळं जनावरा- ढोरागत उन्हा-वाऱ्याशी, चिखल-मातीशी अन् दोरखंडा-फासाशी जखडलं गेलं होतं... अन् त्याच्यानंच शेती करणाऱ्या पोरांना, मग ते लाखोची उलाढाल करीत असले तरी, त्यांना लग्नासाठी म्हणून अजिबात कोणी मुली द्याला धजत नव्हतं. हे आजच्या शेतकरी वर्गाचं कटू-वास्तव होतं...
स्त्रीशिवाय कुटुंब, घरदार आणि संसार, ही कल्पनाच किती विचित्र वाटते ? पण आज मितीला ते कित्येक कुटुंबाचं जित्त-जागतं वास्तव आहे आणि नजीकच्या काळात हेच वास्तव, विराटरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.