Description
प्रत्येक पिढीच्या आवडीनिवडी काळानुसार बदलतात. सध्याचे युग इंटरनेटचे आहे. शाळा सुटली की मुले मैदानावर फारशी दिसत नाहीत, वाचनालयात रमत नाहीत, तर ती मोबाईलकडे झेपावतात. आई- वडीलही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तेही थोड्या वेळाने टीव्हीच्या पडद्यासमोर बसलेले असतात. हातपाय हलवणारी करमणूक कोणाला नको आहे. मेंदूला ताण देणारी तर नकोच नको आहे. जो तो आत्मिक सुखापेक्षा भौतिक संपन्नतेच्या मागे लागला आहे. सुंदर दिवाणखाना, सुसज्ज स्वयंपाकघर, प्रशस्त गॅलरी प्रत्येकाला हवी आहे. देवघरासारखे घरात एखादे ग्रंथघर कोणाला हवे आहे? त्यापेक्षा दूरदर्शन कोठे स्थानापन्न करायचा याची काळजी वाहिली जाते.
घरातील टीव्ही, फ्रीज घराला घरपण देतील; पण घरात ग्रंथघर असेल तर ते घराला शहाणपण देईल. ज्या घरात पुस्तकांसाठी स्वतंत्र जागा असते, पुस्तक खरेदीसाठी पैसा खर्च केला जातो, त्या घरात वाचन संस्कृती सुखाने नांदत असते.